सोमवार, ४ जुलै, २०११


बंका महार,चोखामेळा,त्याची बायको सोयराबाई,त्याची मेव्हणी निर्मळाबाई हे सर्व महार जातीतील संत यांना कोणत्याही प्रकारच शिक्षण मिळाले नाही.परिस्थिती अत्यंत गरिबीची,खायला अन्न पाणी नाही या अवस्थेतही त्यांना किती श्रेष्ट ज्ञान प्राप्त झाले.या सगळ्यांनी संसार केला.गरिबी असूनही ते परमेश्वराला विसरले नाहीत म्हणूनच ते परमेश्वराचे प्रिय झाले.या चोखामेळ्याचा मृत्यू कसा झाला याची ही कथा......
एकदा चोखामेळा गावकुसाची भिंत बांधत होता.त्यावेळी ती भिंत त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने अत्यवस्थ झालेला बंका महार ढिगाऱ्यामध्ये त्याचे अवशेष शोधतो पण त्याला ते सापडत नाहीत.शेवटी बंका महाराला निर्मळाबाई म्हणते,'ज्या ठिकाणी त्याचे अवशेष शोधताना विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या ठिकाणी चोखामेळ्याची अस्थी असतील त्या ठिकाणी त्याचे रक्त सांडलेले असेल.'बंका महार ढिगारा उचलायला सुरुवात करतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ढिगारा उचलत असताना त्याला विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकू येतो.ज्या ठिकाणी जो भाग सापडतो त्या भागाला रक्त लागलेले नव्हते कि कसली घाण येत नव्हती किंवा किडेही पडलेले नव्हते.त्याच्या शरीराचे पाच भाग झाले होते.हे पाचही भाग बंका महार एकत्र करून घेतो.त्याला अग्नी देतो.त्याच्या देहाची जी राख होते त्या राखेतुनही विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकू येत होता.
बंका ती राख घेऊन पंढरपूरला जातो.त्याच्याबरोबर नामदेवांपासून सगळे संत आहेत.त्या रक्षेची स्थापना पंढरपूरला केली जाते.ज्या मडक्यामध्ये ही रक्षा ठेवलेली होती त्या मडक्याला एक कपडा बांधलेला होता.चोखामेळा हा बंकाचा गुरु होता.आपला गुरु गेल्यामुळे बंकाला भरभरून येते.त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात.तो अन्न-पाणी सोडून देतो.चोखामेळ्याच्या समाधीपाशी बसून राहतो.नामदेव महाराज,निळोबा सगळे त्याची समजूत काढतात,'अरे बंक्या उठ.परमेश्वराने आयुष्य दिल आहे ना तर तो बघून घेईल.''अरे,तू सुद्धा चोख्यासारखी भक्ती करत राहिलास तर तुलाही परमेश्वर दिसेल.''माझ्या गुरूला विठोबा दिसला ना भरपूर झाल,मला विठोबा बघायचा नाही,मला फक्त माझा गुरु दिसला पाहिजे.विठोबा दिसला नाही तरी चालेल.आता मला उपास नको,तापास नको,विठ्ठलाचे नाव नको.'
अशा प्रकारे बंका ५१ दिवस चोखामेळ्याच्या समाधीपाशी अन्न-पाणी न घेता बसून राहतो.त्याच्या बाजूला चोख्याची पत्नी आणि निर्मळाबाई बसलेली होती.बाकीचे लोक त्याची येवून जाऊन सेवा करत राहतात.५१ व्या दिवशी जगतमाता रुक्मिणी तिकडे जाते आणि बंकाला म्हणते,'बंका ,किती दमला रे,थोड पाणी पी रे.तुझ आयुष्य ठरलेलं आहे.तुला ते भोगायलाच पाहिजे.तो जरी आधी गेला तरी त्याच गुरुतत्व तर कायम व्यापून आहे.' ''आई,या गोष्टी मला कळत नाहीत आणि कळल्या तरी मला त्या नकोत.मला फक्त एकदाच गुरूने दर्शन द्यावे व सांगावे मी तुझा आहे.माझी आणि त्यांची शेवटची भेटसुद्धा झाली नाही.शेवटच्या क्षणी मी असतो तर सगळे दगड मी माझ्या डोक्यावर घेतले असते.मग त्याला नेण्याची तुमच्या दोघांची काय बिशाद असती!मी आडवा पडलो असतो.आई,तू हे चांगल नाही केलस."
रखुमाई हसते.ती लगोलग विठ्ठलाला जाऊन म्हणते,अहो काय हे अजून कसे तुम्ही स्थितप्रज्ञ,अजून कसे हात कडेवरतीच?उठा माझ लेकरू कस तळमळत आहे बघा.त्याच्या बोलण्याने माझ मन विव्हळत आहे.उठा देवा उठा."विठ्ठल म्हणतो,'अग मी जाऊन काय करू? तो बंका तर स्पष्ट म्हणतो मला विठ्ठल आला तरी नको!" रखुमाई म्हणते ,'तुम्ही चोख्याचे देव आहात न.तुम्ही चोख्याला सांगा.तुम्ही सांगितल्या शिवाय आपल्या शिष्याचा आकांत बघूनही चोखामेळा बाहेर येणार नाही." विठ्ठल कृपेने प्रगटून चोख्याजवळ जातो आणि त्याला आपल्याबरोबर बंकाजवळ घेवून जातो.
बंका महार समोर जेव्हा चार पावल येतात तेव्हा बंका महार फक्त चोख्याची पावल बघतो.संपूर्ण चोख्यालाही बघत नाही.चोख्याची पावल दिसताच बंका चोख्यात विलीन होऊन जातो. संपूर्ण शरीर बघायची त्याला जरूर भासत नाही.हि बंकाची ताकद आहे.आता योगमायेला,रुक्मीणीला प्रश्न पडतो बंका महाराच आयुष्य तर शिल्लक आहे आणि गुरुभक्तीने बंका चोख्यात एकरूप होऊन गेला.आता करायचं काय?आता मार्ग एकच...चोखामेळ्याचे तत्त्व बंकाबरोबर जिवंत करून बंका बरोबर कायमच ठेवण याशिवाय या योगमायेला मार्ग उरत नाही.त्याक्षणी चोख्याचा देहपात होऊनसुद्धा चोख्याच्या आत्मरूपाने जीवात्मारूपाने तो बंका बरोबर बंकाच्या जीवाला देहात्मा सोडेपर्यंत राहण्याची आज्ञा त्या रुक्मिणीला द्यावी लागते.
अशा या चोख्याची समाधी पंढरपूरला आहे.पंढरपूरला गेलो तर तीन गोष्टी विसरायच्या नाहीत एक नामदेवाची पायरी,दुसरी जनाबाईचा देव्हारा आणि तिसरी चोखामेळ्याची समाधी.अगदी प्रेमाने त्यांची भेट घ्यायची.