भटकंती

अंबरनाथचे शिवमंदीर 

महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारसाची साक्ष देत असलेली मंदिरे पाहिल्यावर "देवळांच्या देशा" अशीही महाराष्ट्राची ओळख वाटते. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".


अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर शिलाहार राजा माम्वानी यांच्या राज्यकाळात म्हणजेच १० जुलै १०६० रोजी बांधण्यात आले. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत दाखवले आहेत. या मूर्तीतून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना "अंबरनाथ" हे तिसरे स्थानक आणि येथेच वसले आहे. सांस्कृतिक वारसा असलेले हे शिल्पवैभव. आपल्यापैकी बरेच जण अंबरनाथ येथुन जात येत असतील, पण ज्यांनी येथे येऊन खास हे सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्रकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. लांबुन पाहिले असता जगन्नाथाचा डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटते. तेथे असलेल्या तानसा नदीवरील छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावर केलेले शिल्पकाम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून खाली उतरायला पायर्‍या आहेत. गाभार्‍यात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्‍यात दोन शिवलिंग आहेत. तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे.

अतिशय रम्य परिसरात एका छोट्याशा घाटीत हे सुरेख देऊळ आहे. घाटीतून वाहणा-या ओढ्याला बांध घालून एक लांब पण छोटासा जलाशय तयार केलेला आहे. त्याच्या निश्चल पृष्ठभागावर, झाडांच्या प्रतिबिंबाबरोबरच ऊन-सावल्यांनी नटलेले देऊळपण डोकावत आहे. पळसाच्या लालभगव्या फुलांच्या बरोबरीने देवळाचे काळेजांभळे दगड उठून दिसतात. आजूबाजूचे शांत वातावरण क्वचित एखाद्या मैनेच्या बोलांनी, तर कधी खंड्याने पाण्यात सूर मारताना झालेल्या आवाजांनी भंग पावते. देवळाच्या भिंतीवर उभ्या देवदेवतांच्या रांगा क्वचित जाणा-या येणा-या भक्तांकडे बघत, गेली ९०० वर्षे आपले मौन सांभाळून आहेत. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे, विविध देवी-देवतांची शिल्पे यांच्या चेहर्‍यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो.

महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते.

 
टिटवाळ्याचा महागणपती

 


टिटवाळ्याचा महागणपती! महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे गणपतीचे क्षेत्रही प्रसिद्ध आहे. ह्या गणपतीच्या बाबतीत दोन आख्यायिका सांगितल्या जातात. दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा हा गणपती आहे टिटवाळ्याचा. त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे. जरी त्याला एवढा जुना संदर्भ असला तरी तज्ञांच्यामते ही मूर्ती इ.स. ९ व्या शतकातील आहे.

तसेच दुसरी श्रीमंत माधवराव पेशव्यांना स्वप्न पडले व त्याच्या दुस-या दिवशी ही मूर्ती त्यांचे कारभारी रामचंद्र मेहेंदळे ह्यांना सापडली आणि मग पेशव्यांनी हे मंदिर बांधले. ह्या गणपतीला ‘विवाह विनायक’ असेही म्हणतात. कारण ज्यांच्या पत्रिकेत मंगळ-दोष आहे ज्यांचा विवाह जमत नाही किंवा विवाहानंतर ज्यांची ताटातूट झाली आहे, अशांचे ह्या गणपतीच्या दर्शनाने सर्व मंगल होते असा भक्तांची श्रद्धा आहे. टिटवाळा हे छोटेसे गाव मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते. टिटवाळा स्टेशनवर उतरले की, मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणार्‍या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहान-मोठे सगळ्यांनाच आवडते.

गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरवी फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. आपण थेट गाभार्‍यात पोहचतो. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. गणपतीची मूर्ती गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून आपली नजर खिळवून ठेवते. त्यामुळे आपण आजूबाजूला बघण्याचेच विसरुन जातो. नंतर काही वेळाने लक्ष जाते ते देवघराकडे. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. गाभारा आणि सभा मंडप मध्ये जाळी लावून वेगळे केले आहे. गाभार्‍याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडून आपण सभा मंडपात पोहचतो. इथे स्वरबद्ध गणपत अर्थवशीर्षाची आवर्तनं सुरू असतात. सत्य विनायक, गणेश याग इत्यादी भक्तांनी बांधलेल्या पूजा सुरू असतात. त्यांचा एकत्रित ऐकू येणारा नाद मनाला शांती देऊन जातो.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे. आंबा, करवंद, जांभळे असला रानमेवा बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. टिटवाळ्याचा असा हा महागणपती! मन:शांती देणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा आणि हो धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे काही क्षण भक्तांच्या ओंजळीत अलगदपणे घालणारा!


भोरच राजवाडा



इंग्रजांच्या काळात संस्थाने विलीन झाली आणि संस्थानांच्या ऐश्वर्याला व रूबाबाला उतरती कळा लागली. इंग्रजांच्या राहणीमानाचा प्रभाव संस्थानिकांनी तर फार अल्पकाळात अंगी रुजवला. त्यामुळे परंपरा व पाश्चिमात्य पगडा यांचे एकत्र रूप त्यांच्या राहणीमानातून व वास्तूकलेतून दिसून येते. पुण्यापासून जवळ औंध, सांगली, फलटण, जमखिंडी अशा संस्थानांचा वारसा अनेक कलाकृतींमधून जिवंत आहे. पुण्यापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर भोर संस्थानचं वैभव अजूनही वास्तुरूपानं सांभाळलेलं आहे.

भोरचा राजवाडा उभा आहे. राजवैभव जरी सरलं तरी त्या काळाच्या ऐश्वर्याची व उच्च अभिरूचीची कल्पना वास्तूच्या अंतर्बाह्य रूपातून प्रतीत होते. ब्रिटीश सरकारच्या संस्थान खालसा धोरणामध्ये, हे एकमेव असे संस्थान होते ज्याला ब्रिटीश सरकार खालसा करू शकले नाहीत.


२०१० मध्ये राजवाड्याच्या वास्तूला १४१ वर्षे पूर्ण होत आहेत. राजवाड्याची पुनर्बांधणी ही इंग्रजांच्या काळात आल्यामुळे साहजिकच पेशवेकालीन शैली व व्हिक्टोरियन शैली यांची रसमिसळ वास्तुकलेमधून दिसून येते. चार मजली राजवाड्याचे क्षेत्रफळ सुमारे ४४ हजार चौरस फूट आहे. अप्रतिम लाकूडकाम, दगडकाम, वीटकाम यांचा मिलाफ वाड्याच्या वास्तुशिल्पामधून दिसून येतो. तीन चौकी प्रशस्त वाड्याची जमिनीवरील व्याप्ती इंग्रजी ‘एल’ अक्षराप्रमाणे आहे. पूर्वाभिमुख वाड्याचे प्रथमदर्शनी रूप मोठे वेधक आहे. नगारखान्यासहित लाकूडकामातील महिरपींनी परिपूर्ण असे प्रवेशद्वार भव्य जरी असले तरी वा
ड्याच्या आकारमानाच्या तुलनेत सौम्य व पेशवेकालीन शैलीप्रमाणे अनुरूप आहे. त्यामध्ये प्रमाणबद्धता व लाकूडकामाच्या कारागिरीची सुबकता नजरेत भरते. प्रथम चौकात प्रवेश केल्यावर पेशवेकालीन व व्हिक्टोरियन शैलीची कलाकृती दिसून येते. उंच जोत्यासाठी पाय-यांची रचना, उभे खांब यातून रूबाबदार प्रवेशद्वाराची प्रतिमा अनुभवास येते.

दुस-या चौकात प्रवेश केल्यावर मात्र वास्तुकलेचे नजर विस्फारणारे रूप दिसते. दुमजली चौकाच्या मध्यभागी दुप्पट उंचीचा दरबाराचा भव्य शामियाना ही क्वचितच दिसणारी संरचना आहे. एकसंघ लाकडातील दुप्पट उंचीचे खांब, महिरपी आणि शामियान्याच्या बाजूने चौकात झिरपणारा प्रकाश चौकाचे सौंदर्य द्विगुणीत करतात. शामियान्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये ओस-या, पहिल्या मजल्यावरून नक्षीदार कमानीची गॅलरी शामियान्याच्या सौंदर्यात भर घालतात. ओस-यामधील गुळगुळीत जमीन ही चुन्यामध्ये बाभळीच्या बिया घोटून तयार केली आहे व अनेक दशकांनंतरही ती शाबूत आहे. दक्षिणेकडील चौकाभोवती राहण्यासाठी दालने, स्वयंपाकघर व भोजनघर आहेत. चौकामध्ये उघडणा-या कमानीच्या खिडक्यांमुळे दोन्ही मजल्यांवर भरपूर प्रकाश व खेळती हवा यांचा आनंद घेता येतो. तळमजल्यावरील ऐसपैस स्वयंपाकघरात धूर कोंडू नये म्हणून छतामधून अत्यंत कौशल्याने छोटी छोटी धुराडी सामावली आहेत. चार-चार धुराडी असलेल्या या मुदपाकखान्यात एकेकाळी पंचपक्वानांच्या लज्जतदार शाही भोजनावळी घडल्या असतील.

१७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पंतसचिव घराण्याच्या वंशवेलीचा उल्लेख रावसाहेब व्ही. जी. रानडे यांनी भोरचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांच्या कारकीर्दीवर लिहिलेल्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. घराण्याचा इतिहास व रावसाहेबांच्या कारकीर्दीमध्ये घडलेल्या घटनांची, त्यांनी संस्थानासाठी वेळोवेळी केलेल्या सुधारणांची, संस्थानास भेट दिलेल्या पाहुण्यांची तपशीलवार नोंद या ग्रंथामध्ये आहे. संस्थानाच्या विकासासाठी रस्ते, पूल, भाटघर धरण, शाळा, वाचनालय, व्यायामशाळा वेळोवेळी बांधल्या गेल्या. तसेच महात्मा गांधीच्या स्वातंत्र आंदोलनासाठी अनेक वास्तू वापरण्यासाठी दिल्या गेल्या. भोर संस्थानची, पुणे शहरातील जुन्या वास्तूंची अनेक दुर्मीळ छायाचित्रे या ग्रंथामध्ये आहेत. सहाव्या शतकातील नल आणि मौर्य राजवटीपासून या भागाच्या इतिहासाचा मागोवा हाती लागतो. १२ व्या शतकात शीलाहार राजवट, १३ व्या शतकाच्या मध्यापर्यंत देवगिरीच्या यादवांचे राज्य, १३४७ नंतर बहामनी, १४ व्या शतकात अहमदनगरचा मलिक अहंमदपासून मुघलांचा अंमल सुरू झाला. त्यानंतर शिवाजीमहाराजांच्या दरबारी पैठणजवळील गंडापूरचे श्री शंकरजी नारायण गंडेकर यांची प्रथम पंतसचिवपदी नियुक्ती असा उल्लेख आढळतो. तिसरे पंतसचिव श्री. चिमाजी नारायण यांच्या कारकीर्दीत १७४० मध्ये राजवाडा बांधला. १८५८ व १८६९ अशा दोन वेळा लागलेल्या आगीमध्ये त्याचे नुकसान झाल्यामुळे १८६९ मध्ये वाडयाची पुनर्बाधणी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून करण्यात आली.

पंतसचिव घराण्याच्या नवीन पिढीनेही त्याचे महत्त्व जाणून हा राजवाडा उमेदीनं सांभाळला आहे. दरवर्षी राजवाडयात रामनवमीचा सण मोठया दिमाखात साजरा केला जातो. आजही रामनवमीला गावभोजन असते. त्यासाठी दक्षिणेकडील भागात मोकळे पटांगण राखून ठेवले आहे. या पटांगणाकडील भिंतीमध्ये काही नक्षीदार खाचा ठेवल्या आहेत. या खाचांची अनभिक्षिक्त मालकी हिरव्यागार डौलदार पोपटांच्या थव्याकडे आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील दालने व चौक पार केल्यावर मागील बाजूस भलीमोठी विहीर आहे. विहिरीमध्ये टप्प्याटप्प्याने उतरणा-या काळ्या पाषाणातील पाय-या आहेत. इथला परिसर जलात निवांतपणे पाय पसरून पहुडलेल्या बालकवीच्या औदुंबराची आठवण जागवणा-या वृक्षराजांनी बहरला आहे. शेकडो लोकांचा वावर एकेकाळी असणा-या वाड्याची क्षुधाशांती करणारी विहीर कलात्मकतेने बांधली आहे. पूर्वेकडील पहिल्या मजल्यावरील दालनात सुरुदार खांबांनी बैठक सजली आहे. उत्कृष्ट लाकूडकामातील महिरपी वेलबुट्यांनी सजलेले छत, हंड्या, झुंबरे ही सजावट गतकालीन उच्च अभिरुचीची आठवण जागवतात. तीन चौकाभोवती गुंफलेली राजवाड्याची संरचना प्रत्येक चौकाचं वेगळं वैशिष्टय राखून आहे. उत्कृष्ट प्रतीची लाकडातील कामगिरी व उत्तम प्रतीचे वीट व दगडकामाचे सौंदर्य राजवाड्याच्या संपूर्ण भागात दिसून येते.

मध्यवर्ती चौकामध्ये रामजन्माचा डोळे दीपवणारा सोहळा रामनवमीला साजरा होता. पंतसचिव घराण्याची नवीन पिढी पारंपरिक पोषाखात व परंपरेस अनुसरून या सोहळ्याचे प्रतिनिधित्व करते. पंतसचिव कुटुंबीय रामजन्माची पालखी खांद्यावरून राजवाड्यात घेऊन येतात. लोड-तक्के, जाजमांनी मध्यवर्ती चौक सजवला जातो. तेथे फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामजन्माचा सोहळा पार पडतो. गावातील सर्वसामान्य जनता, पंतसचिवांचे आप्त, मित्रमंडळी वाड्यामध्ये हजेरी लावतात. भजन कीर्तनाचा कार्यक्रमही होतो. फुलांच्या सजावटीने व माणसांच्या वावराने भल्या मोठ्या राजवाड्यात चैतन्य पसरते. वाड्याबाहेर जत्रा भरते. रामजन्मानंतर भोजनगृहात प्रसादाच्या पंगती उठतात.

संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे.

किल्ले रायगड

किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवण्याचे निश्चित केले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.अफ़झलखानाच्या स्वारीच्या काही महिने अगोदर त्यांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे याच्या कडून जिंकून घेतला आणि रायरीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेउन येथे बुलंद किल्ला बांधावा असे मनी घेतले. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.





पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.



जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.



या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.




शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायर्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.
नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोप-या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.


जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि आ रानमोळी







अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो.



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे.






मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आह इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.



इतिहास

१६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.




प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

कसे जाल


महाड,पोलादपूरकडून किव्वा वाई ,महाबळेश्वरकडून आलं कि ,कुंभरेशी किंवा वाद नावाचे छोटुकल गाव लागतं .गडाच्या आग्नेयेस पारं नावच खेडं आहे .दोन्ही गावांमधून प्रतापगडावर जाता येतं 
किल्ले जंजिरा       'महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारु आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमरवानाची नेमणूक केली.

राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमनवानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारुचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारुचे काही पिंप त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमरवानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमरवाना मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारु पिऊन झिंगले असताना पिरमरवानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करुन मेढेकोट ताब्यात घेतला.

पुढे पिरमरवानाच्या जागी बुर्हाणरवानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्हाणरवानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.

जंजिर्याचे सिद्दी हे मुळचे ऑबिसिनियामधील. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होवू शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडलेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्हाणखान इतर सत्ताधिशांना सुचवतोच की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका.


या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.

जंजिर्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत भाग दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्यावरील सामराजगड ही येथून दिसतो. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'

असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

किल्ले सिंहगड
पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.


इतिहास


पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:



तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.






गडावरील ठिकाणे

दारूचे कोठार
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणार्या कोठारावर दि. सप्टेंबर ११ इ.स. १७५१ मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला
रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राहण्यासाठी येत. इ.स. १९१५ साली लोकमान्यांची आणि महात्मा गांधींची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर
हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि सांब असून हे मंदिर यादवकालीन आहे.

देवटाके
तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. याचा उपयोग आजही पिण्याचे पाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा
गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर खालील शिलालेख आढळतो




गडावर जाण्याच्या वाटा


सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.

मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.
किल्ले राजमाची