तयाचे आम्हा व्यसन | ते आमुचे निधिनिधान ||
किंबहुना समाधान | ते मिळती तै ||
(ज्ञानेश्वरी १८ /१७९४)
सुदामा हा श्रीकृष्णाचा बालमित्र. कृष्ण सोन्याच्या महालात राहत होता तर सुदाम्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती.पत्नीच्या आग्रहावरून सुदामा कृष्णाकडे गेला.कृष्णाच्या महालात तो आठ दिवस राहिला.एक दिवस महालातील वेगवेगळी दालने पाहत असताना सुदाम्याने एका दालनाजवळ "देवघर" अशी पाटी पहिली.सुदाम्याला ती पाटी पाहून आश्चर्य वाटले. कृष्ण स्वतः परमात्मा आहे.त्याच्या देवघरात कोणता देव असेल?मोठ्या कुतुहलाने सुदामा त्या दालनात शिरला आणि काय आश्चर्य!
त्या दालनात राधेची मूर्ती होती,अर्जुनाची मूर्ती होती,उद्धव होता आणि चक्क सुदामादेखील होता. आपली स्वतःची मूर्ती भगवंताच्या देवघरात पाहून सुदाम्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या.भक्त हेच भगवंताचे ऐश्वर्य असते.तो नियम देव आणि भक्त यांना लागू आहे.
भगवान रामकृष्ण परमहंस यांना नरेंद्रनाथाला (विवेकानंद)पाहण्याचे असेच व्यसन लागले होते. दोन-चार दिवस नरेंद्रनाथ जर आला नाही तर रामकृष्ण बेचैन व्हायचे. या जगात कोणतेच प्रेम एकतर्फी नसते. जे एकतर्फी असते ते प्रेम नसते. ती वासना असते. पुंडलीकामुळे विठ्ठलाचे महात्म्य वाढले तर विठ्ठलामुळे पुंडलिक अजरामर ठरला.तेव्हा भगवंताचेही आपल्यावर प्रेम आहे हे भक्ताने ध्यानात ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा